अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार, उद्या भरणार अर्ज

Anonymous
By -


अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार, उद्या भरणार अर्ज

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 :

अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे. आज दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना हे मोठं गिफ्ट मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

काँग्रेसमध्ये अनेक वर्ष घालवलेले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली. 

त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, तसेच आमदारही त्यांच्यासोबत बाहेर पडले असून आज दुपारीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर यांच्या समवेत नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांचा आज भाजप प्रदेश कार्यालय येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश होणार आहे. तसेच नाशिक आणि औसा मधील पदाधिकाऱ्यांचासुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज दुपारी काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांसारेख पक्षातील दिग्गज नेते एकामागोमाग पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची हायकमांडसोबत चर्चाही झाली. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी काही आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. हे डॅमेज कंट्रोल करण्याकरीता कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आमदारांशी संपर्क साधत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर आता आजही काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही बैठक बोलावली आहे. चेन्निथला हे आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतील. आज दुपारी १ वजात ही बैठक पार पडेल.