सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची मान्यता

Admin
By -

 


सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची मान्यता

आराखड्यातून पाटण तालुक्यात ६७ कोटी रुपयांची विविध कामे मार्गी लागणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आग्रही आहेत. त्यांच्या मान्यतेमुळे या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या आराखड्यातून पाटण तालुक्यात तब्बल ६७ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावून तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यात येणार आहे. 


गुरुवारी, २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिखर समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी सातारा जिल्ह्याच्या एकात्मिक विकास आराखड्यास मान्यता देऊन त्याकरिता सुमारे ३८१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. या आराखड्यात पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास, तसेच कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन यांच्या कामांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. 


यात सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकासासाठी कुसवडे-कारवट, कोयना-हेळवाक, पाणेरी व भोसगांव आदी विभागांत निसर्ग पर्यटनास पूरक कामे करण्यात येणार आहेत. त्यातून येत्या दोन वर्षांत प्रामुख्याने प्रेक्षागृह, तंबू निवास, सोलर लाइट, फ्लोटिंग जेट्टी, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटक सफारीकरीता वाहने, बालोद्यान आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 


तसेच कोयना-हेळवाक वन विभागअंतर्गत कोयना नदी जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पाटण तालुक्यात विकासकामे करण्यात येणार आहेत. यात कोयना ते कृष्णा नदीपात्रातील हेळवाकपासून मल्हारपेठपर्यंत ४१ कि.मी. लांबीचे नदीपात्र जलपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. त्यात रॅम्प, पॅव्हिलियन, फ्लोटिंग जेट्टी, जेट स्की आदी सुविधांसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


या निसर्ग पर्यटनाला पूरक विकासकामे व सुविधांमुळे पाटण तालुक्यातील पर्यटनास चालना मिळेल. तालुक्यात यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त

 केला आहे.